Pahalgam Terror Attack Latest News: पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये हल्ला झाल्यानंतर पहिला प्रश्न उपस्थित केला जात आहे की, इतके पर्यटक असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांकडूनही हाच मुद्दा मांडला गेला. या प्रश्नाचं उत्तर अखेर केंद्र सरकारने दिलं आहे. हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सुरक्षा व्यवस्थेत कुठे चूक झाली? हल्ला झालेल्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सरकारने सविस्तर माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे का? सुरक्षा व्यवस्थेत चूक झालेली नाहीये का? असे मुद्दे विरोधकांनी बैठकीत उपस्थित केले. यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की, हे शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये हल्ला झाला, याचाही तपास केला जात आहे.
पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये सुरक्षा जवान का नव्हते?
पहलगामपासून काही किमी अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये निशस्त्र पर्यटकांना घेरून दहशतवाद्यांनी हत्या केली. या ठिकाणीही कोणतीही सुरक्षा नव्हती. घटना घडलेल्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात का नव्हते? असा मुद्दा बैठकीत विचारण्यात आला.
सरकारने बैठकीत सांगितलं की, 'दरवर्षी हा मार्ग अमरनाथ यात्रेसाठी जून महिन्यात खुला केला जातो. अमरनाथला जाणारे भाविक पहलगाममध्ये थांबतात, आराम करतात. पण, यावेळी स्थानिक टूर्स ऑपरेटर्संनी सरकारला न सांगताच बुकींग सुरू केली. टूर ऑपरेटर्संनी २० एप्रिलपासूनच पर्यटकांना त्या ठिकाणी नेण्यास सुरूवात केली होती.'
'स्थानिक प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. दरवर्षी जून महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी इथे सुरक्षा जवान तैनात केले जातात', असे उत्तर सरकारने बैठकीत दिले.
असदुद्दीन ओवेसींच्या प्रश्नावर सरकारचे उत्तर काय?
सरकारने सिंधू नदीचे पाणी बंद केले आहे. त्याबद्दल खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला. जर भारताकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीये, तर पाणी बंद करण्याचा फायदा काय?
त्यावर सरकारने सांगितले की, भारत कठोर कारवाई करू शकतो, हा मेसेज देण्यासाठी सिंधूचे पाणी बंद करण्यात आले आहे. यातून भारत पुढे काय करू शकतो, हा मेसेज जाईल.