२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र हा हल्ला करणारे चार दहशतवादी पसार झाले होते. त्यामुळे पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत श्रीनगरमधील लिडवास परिसरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर येत आहे. लष्कराने ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी हाशिम मुसा हा पहलगालम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. तसेच लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे फोटोही समोर आले आहेत.
लिडवासमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंड होता. तसेच त्याने सोनमर्ग टनेल येथेही मोठा हल्ला घडवून आणला होता. त्या हल्ल्यात सात जण मारले गेले होते. त्यांच्यामध्ये सहा मजूर आणि एका डॉक्टरचा समावेश होता.
हाशिम मुसा हा लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता. त्याला सुलेमान शाह मुसा फौजी या नावानेही ओळखले जात असे. तो पाकिस्तानच्या एसपीजीमधील पॅरा कमांडो होता. पहलगाम हल्ल्यानंतर तो दाचीगाम आणि लिडवासच्या जंगलांमध्ये लपून बसला होता. तिथून तो पाकिस्तानमध्ये पळण्याच्या तयारीत होता.
दरम्यान, लिडवास येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह आणि हत्यारे दिसत आहेत. या कारवाईदरम्यान, लष्कराने स्वदेशी ड्रोन आणि रडारचा वापर केला. ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या हालचालींवर रात्रभर नजर ठेवली गेली. तसेच थर्मच कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही त्यांचा शोध घेतला गेला. त्याशिवाय आयईडी नष्ट करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला. अखेरीस आज सकाळी बराच वेळ चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने इथे लपलेल्या तिनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले.