२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या २६ जणांमध्ये भारतीय नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. दरम्यान, विनय नरवाल यांचा आज २७ वा जन्मदिन होता. त्यानिमित्त कर्नाल येथे त्यांच्या कुटुंबीयांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पती विनय नरवाल यांना श्रद्धांजली वाहताना पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर झाले. अशा परिस्थितीतही त्यांनी देशवासियांना कळकळीचं आवाहन केलं आहे.
पहलगाममधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली होती. त्यावरून सध्या देशात प्रचंड संतापाचं वातावरण आहे. तसेच काही जणांकडून त्याला हिंदू मुस्लिम असा रंग देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी देशवासियांना हे आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, कुणाबाबत द्वेष निर्माण व्हावा, असं मला वाटत नाही. मुस्लिम आणि काश्मिरी लोकांबद्दल द्वेष पसरवला जावू नये. आम्हाला शांतता हवी आहे, केवळ शांतता, असेहीत त्या म्हणाल्या.
हिमांशी यांनी पुढे सांगितले की, आम्हाला न्याय हवा आहे. ज्या लोकांनी त्यांच्यासोबत चुकीचं केलंय, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, विनय नरवाल यांनी आपल्या देशाची सेवा पूर्ण निष्ठेने केली. त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात कायम राहतील.