गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. तसेच या हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता आठवडा उलटत आला तरी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही. तसेच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर झालेल्या कारवाया वगळता इतर कारवायांबाबतही निर्णय झालेला नाही. त्यामुळे देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसने सोशल मीडिया अकाउंटवर ‘गायब’ असा एक फोटो टाकत मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडलं, असं शीर्षक देत काँग्रेसने चार फोटो शेअर करून मोदींवर टीका केली आहेत. त्यात मोदींकडून पंतप्रधान म्हणून असलेली अपेक्षा आणि त्यांनी घेतलेली भूमिका यांची तुलना करत टीका करण्यात आळी आहे.
यातील पहिल्या फोटोमध्ये मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर पीडितांना नुकसान भरपाईची घोषणा करायला हवी होती. मात्र मोदींनी बिहारमध्ये जात निवडणुकीसाठी आश्वासनं दिली, असा टोला काँग्रेसने लगाला आहे. तर दुसऱ्या फोटोमधून मोदींनी पहलगाम हल्ल्याबाबत पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी मन की बात केली, असा आरोप काँग्रेसने केला. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी तातडीने काश्मीरचा दौरा करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी निवडणुका असलेल्या बिहारचा दौरा केला, अशी टीका काँग्रेसने तिसऱ्या फोटोमधून केली. तर या हल्ल्यानंतर मोदींनी जखमींची भेट घेणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी राजकीय भेटीगाठींवर भर दिला, असा टोलाही काँग्रेसने चौथ्या फोटोमधून लगावला.