Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी 30 एप्रिल रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत, भारतीय ब्रिक्स शेर्पा बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी तीव्र मोहीम राबवली आहे. याशिवाय पाकिस्तानवरही विविध मार्गाने मोठी कारवाई केली जात आहे. यामध्ये सिंधू करार रद्द करणे, पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकाऱ्यांसह भारतात व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणे, अशा कारवायांच्या समावेश आहे.
ब्राझीलमध्ये बैठकब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स बैठकीला 11 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा मुख्य उद्देश जुलैमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचा अजेंडा तयार करणे आणि अंतिम रुप देणे आहे. या बैठकांमध्ये एआय, हवामान वित्त, सीमापार देयक उपक्रम आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या बाबींवर चर्चा केली जाईल.
या बैठकीत युक्रेन आणि पश्चिम आशियासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा चिंतांवर लक्ष ठेवून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, ब्रिक्स व्यासपीठावर भारताची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भारतीय ब्रिक्स शेर्पाचा सहभाग महत्त्वाचा ठरेल.