Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकेबंदी करुन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शोपियां, कुलगाम आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवून देण्यात आली आहेत. दहशतवादी आदिल थोकरचे घरही बॉम्बने उडवून देण्यात आले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आदिलने मदत केल्याचे समोर आले आहे.
आदिल थोकर ऊर्फ आदिल गुरी असे नाव असलेल्या दहशतवाद्यानेच बैसरनमध्ये पर्यटकांची हत्या करण्याचा कट रचला आणि तो हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. आदिलनेच पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतात प्रवेश करुन दिला होता. त्यानंतर हल्ला करण्यात आला. बिजबेहारा येथील गुरी या छोट्याशा गावातील रहिवासी आदिल अहमद थोकर या कटात सहभागी असल्याचे उघड झालं. गुप्तचर संस्थांच्या मते, आदिलने पाकिस्तानातून एका दहशतवाद्याला भारतात घुसवण्यात आणि पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात मदत केली.
आदिल २०१८ मध्ये वैध विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. तो कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता. पाकिस्तानमध्ये, त्याने सीमेपलीकडे कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी संपर्क साधला होता. पाकिस्तानमध्ये असताना तो सुमारे आठ महिने सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून गायब राहिला. भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या डिजिटल हालचालींवर आणि बिजबेहरा येथील त्याच्या घरावर बारीक लक्ष ठेवून होत्या. २०२४ मध्ये त्याच्या हालचालींवर लक्ष वाढवण्यात आले.
ऑक्टोबर २०२४ मध्ये, आदिलने पूंछ-राजौरी सेक्टरच्या खडकाळ आणि दुर्गम भागातून गुप्तपणे भारतात घुसखोरी केली. त्याने ३-४ लोकांच्या गटासह नियंत्रण रेषा ओलांडली. भारतात प्रवेश केल्यानंतर, आदिलच्या किश्तवाडमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तो किश्तवार किंवा त्रालच्या टेकड्यांमधून अनंतनागला पोहोचला, जिथे त्याने दहशतवाद्यांशी पुन्हा संपर्क निर्माण केला किंवा मोठा कट रचण्याची तयारी सुरु केली होती.
त्यानंतर आदिलने पहलगाम हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अनेक आठवडे आश्रय दिला होता. योग्य संधी मिळेपर्यंत तो शांत राहिला. दुसरीकडे, अनंतनाग यात्रेमुळे बैसरन व्हॅली बंद करण्यात आली होती. मार्चपासून पर्यटक पुन्हा तिथे येऊ लागले. याचा फायदा घेत आदिलने बैसरनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक तपासात या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी त्यांना मदत केली होती.