लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : समोर आलेल्या कामात स्वतःला पूर्ण झोकून देणे हे चांगलेच असते. त्यामुळे बॉस आणि सहकाऱ्यांकडून कौतुकही मिळते. मात्र, सतत बौद्धिक काम केल्याने भावनिक आणि मानसिक क्षमतांवर नकारात्मक परिणाम होत आहे. शिवाय जास्त काम केल्याने मेंदूची रचना बदलतेय, असे दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
अभ्यासात ११० कर्मचाऱ्यांमध्ये जास्त कामाचे परिणाम पाहिले गेले. यात ७८ जणांनी ठरलेल्या तासांनुसार, तर ३२ जणांनी जास्त काम केले होते.
खूप वेळ काम हा तर ‘साथीचा आजार’
हे संशोधन ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्नमेंटल मेडिसीन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य धोरणाच्या गरजेवर भर दिला आहे. तज्ज्ञ रूथ विल्किन्सन यांनी म्हटले की, खूप वेळ काम करण्याच्या ‘साथीच्या आजाराला’ दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. सध्याच्या डिजिटल युगात नेहमी ड्यूटीवर उपलब्ध राहिल्याने सामान्य कामाच्या वेळेचा अधिकार हिरावून घेतला जातो आहे.
निर्णय घेण्याच्या भागांवर परिणाम
ज्यांनी आठवड्यातून ५२ तास किंवा त्याहून अधिक वेळ काम केले त्यांच्या मेंदूच्या कार्यकारी प्रकिया आणि भावनात्मक नियमनात सहभागी असलेल्या मेंदूच्या भागात मानक तास काम करणाऱ्या सहभागींच्या तुलनेत लक्षणीय बदल दिसून आले. संशोधकांनी सांगितले की जास्त काम केल्याने मेंदूच्या नियोजन आणि निर्णय घेण्याच्या भागांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्यांच्यामध्ये संज्ञानात्मक आणि भावनिक बदलदेखील दिसून आले.
मानसिक आरोग्य खालावले
जे लोक मानक तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीशी संबंधित मेंदूच्या भागावर परिणाम झालेला दिसून आला. याशिवाय त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही दिसून आला. चुंग आंग विद्यापीठ आणि योनसेई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशाेधन केले.