नवी दिल्ली – मागील वर्षी कोरोना काळात कामानं नावलौकिक मिळवणाऱ्या राजकीय आयुर्विज्ञान संस्थान(जिम्स)च्या डॉक्टरांची असंवेदनशीलता पुढे आली आहे. जिम्समध्ये गुरूवारी उपचार करण्यासाठी एक महिला रुग्ण पोहचली. या महिलेची तब्येत खालावत चालली असताना याठिकाणी एकही डॉक्टर तिला रुग्णालयात दाखल करणं तर दूरच साधं तपासायलाही आला नाही. त्यामुळे या महिला रुग्णांचा कारमध्येच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. पण दुसरीकडे दिल्लीत काही डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेमुळे महिला रुग्ण जागृती गुप्ता हिला उपचाराविना ३ तास तडफडावं लागलं. नातेवाईकांनी उपचारासाठी विनवण्या केल्या तरीही डॉक्टर तपासण्यासाठी आले नाहीत. या महिलेला रुग्णालयातही दाखल करून घेतले नाही.
जेव्हा महिला रुग्णाने तडफडून अखेर कारमध्ये शेवटचा श्वास घेतला तेव्हा डॉक्टर आले आणि त्यांनी महिलेला मृत घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी या महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्याची तसदीही घेतली नाही. जिम्स प्रशासनाचा अमानवीय चेहरा तेव्हा समोर आला जेव्हा रुग्णालयात १३ बेड्स रिकामे होते. बेड खाली असतानाही बहाणा बनवून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बेड नाकारले जात होते. या महिलेला हॉस्पिटलला घेऊन येणाऱ्या सचिन कुमारने सांगितले की, अनेक हॉस्पिटलच्या चक्करा मारून झाल्यानंतर आम्ही जिम्स हॉस्पिटलला पोहचलो.
जिम्समध्ये बेड खाली असल्याची माहिती मिळाली होती. परंतु याठिकाणी आल्यानंतर बेड नाही असं सांगून डॉक्टरांनी आमची दिशाभूल केली. ज्यावेळी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या विचारली तेव्हा तेथील डॉक्टरांना राग आला आणि ते संतापले. तुम्ही रुग्णाला दुसरीकडे घेऊन जा असं सांगितले. याच प्रकारात विलंब झाला आणि कारमध्येच महिलेले प्राण सोडले. जिम्स प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रुग्णालयाने दिलं स्पष्टीकरण
महिलेची अवस्था गंभीर होती आणि याठिकाणी पोहचताच तिचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि हॉस्पिटलवर लावलेले आरोप निराधार आहेत असं संचालक ब्रिगेडियर डॉक्टर राकेश गुप्ता यांनी सांगितले.