RSS Press Conference :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आज (23 मार्च) बंगळुरू येथे समारोप झाला. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या तीन दिवसीय बैठकीचे निष्कर्ष प्रसारमाध्यमांसोबत शेअर केले. यासोबतच महाराष्ट्रासह देशात सुरू असलेल्या विविध मुद्द्यांवरही भाष्य केले. त्यांनी औरंगजेबापासून ते मुस्लिम आरक्षण आणि भाजप अध्यक्षांपर्यंतच्या मुद्द्यांवर आरएसएसची भूमिका जाणून घेण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, औरंगजेबाने जे काही केले, त्याबद्दल त्याला आयकॉन मानले जाऊ शकत नाही. दिल्लीत एक औरंगजेब रोड होता, त्याचे नाव अब्दुल कलाम रोड करण्यात आले. यामागे काही कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहला कोणीही नायक बनवले नाही. 'गंगा-जमुना' संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी कधीच दारा शिकोहला पुढे आणण्याचा विचार केला नाही. आपण भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या व्यक्तीला आपला आयकॉन बनवणार की, या देशाची संस्कृती, परंपरा आणि मातीशी नाळ असलेल्या लोकांना आपला आयकॉन?
स्वातंत्र्याचा लढा हा केवळ इंग्रजांविरुद्ध लढला गेला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी मुघलांविरोधात लढा दिला होता. तोही स्वातंत्र्यलढाच होता. देशातील जनतेने ठरवायचे आहे की, ते औरंगजेब मानतात की दारा शिकोहला आपले आयकॉन मानतात? देशाला गांभीर्याने विचार करावा लागेल की, आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले? देशाच्या शूर सुपुत्रांनी इंग्रजांच्या आधी आलेल्या आक्रमकांशी लढा दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपाध्यक्ष निवडीत आमचा हस्तक्षेप नाहीभाजप अध्यक्षांसाठी (भाजपमध्ये) प्रचारक पाठवण्याचा आमचा हेतू नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीनुसार अध्यक्ष निवडण्यास स्वतंत्र आहेत. यात आम्हाला काहीही विचारण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरणही होसबळे यांनी यावेळी दिले. आपल्या समाजात जाती आणि समुदायाच्या आधारावर भांडणे होऊ नयेत. जेव्हा कोणी खेळात पदक जिंकतो किंवा सीमेवर सैनिक शहीद होतो तेव्हा आपण त्याचा धर्म किंवा जात बघत नाही. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही ते यावेळी म्हणाले.
मुस्लिम आरक्षण अयोग्यभारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनाही हे नको होते. कोणतेही सरकार असे करत असेल, तर ते बाबासाहेबांच्या हेतूविरुद्ध काम करत आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही धर्माच्या आधारावर आरक्षणाची घोषणा केली होती. पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.