Shashi Tharoor on 50% tariff News: "डोनाल्ड ट्रम्प व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण खूप सारे देश रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. चीनच्या सामानावर ३० टक्के टॅरिफ आहे. चीनला ९० दिवसांचा वेळ दिला गेला. मग डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राधान्य कशाला आहे. भारताने आता या सगळ्यांचा गोष्टींचा विचार करायला हवा", अशी भूमिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मांडली. भारत-अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या व्यापार कराराबद्दलही थरूर यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार शशी थरूर म्हणाले, "चीनच्या सामानावर ३० टक्केच टॅरिफ लागणार आहे. मग ट्रम्प यांचे प्राधान्य कशाला आहे? यामुळे भारतासोबतच्या राजनैतिक संबंधावर काय परिणाम होतील? चीनसोबतच्या अमेरिकेच्या स्पर्धेबद्दल काय सुरू आहे? या सगळ्या गोष्टींचा भारताना विचार करायला हवा."
भारताने आत्मसन्मानाचा विचार करायला हवा
"कदाचित असेही असू शकते की ट्रम्प हे सगळं व्यापार करारासाठी दबाव टाकण्यासाठी करत असावेत. पण, ट्रम्प यांनी अनेकवेळा अशा भाषेचा वापर केला आहे की, भारताने आपल्या आत्मसन्मानाचाही विचार करायला हवा. हे खूप दुर्दैवी आहे", असे थरूर म्हणाले.
"भारत सरकारने कठोर शब्दात उत्तर देऊ नये, पण उत्तर द्यायलाच हवे. दोन्ही देशांचे संबंध एकमेकांचा आदर ठेवून असायला हवेत. इथे आता २०० वर्षांपूर्वीची राजेशाही पद्धत सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही. चर्चा नेहमी देवाण-घेवाणीनेच होतात. कोणतेही संबंध असे एकतर्फी चालत नाहीत. आपल्या इतर बाजारपेठा शोधाव्या लागतील", असे शशी थरूर म्हणाले.
...तर भारताने गुड बाय म्हणावं -थरूर
"आपले अमेरिकेसोबत चांगले संबंध राहिले आहेत. फक्त अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या म्हणण्यामुळे आपले संबंध खराब होणार नाहीत. पण, भारताला आता राष्ट्रहित समोर ठेवून निर्णय घ्यावे लागतील. ट्रम्प वाटाघाटीच्या चर्चेसाठी येत नाहीत. ते त्यांचं म्हणणं मांडत आहेत, पण जेव्हा समोरासमोर या चर्चा होतील, तेव्हा आपल्या शिष्टमंडळाच्या हा दबाव झुगारावा लागेल", असे थरूर म्हणाले.
"जिथे गोष्टी सोडल्या जाऊ शकतात, तिथे त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. मात्र, जिथे देशहिताचे नुकसान होईल, अशा अमेरिकेच्या अटी असतील, त्यावर ठामपणे आपली बाजू मांडावी. हे सगळं होऊनही अमेरिकेसोबत व्यापार करार होत नसेल, तर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणून परत यावं आणि अमेरिकेतून येणाऱ्या सामानावर ५० टक्के टॅरिफ लावावा", असा सल्ला शशी थरूर यांनी मोदी सरकारला दिला.