पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनांचं जबर नुकसान झालं आहे. तसेच भारतीय सैन्यदलांनी थेट पाकिस्तानमधील काही अड्ड्यांना लक्ष्य केल्याने पाकिस्तानी लष्कराची पुरती नाचक्की झाली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे परराष्टमंत्री इसाक डार यांनी भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा विषय आणखी न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणीलले की, मी किमान २६ देशांच्या प्रमुखांशी बोललो आहे. सर्वांनी भारत आणि पाकिस्तान यांनी सध्याचा निर्माण झालेला तणाव हा अधिक वाढवता कामा नये, असा सल्ला दिला आहे. आम्हीही संयम बाळगू असं आश्वासन त्यांना दिलं आहे. आम्ही काल रात्री भारताच्या हल्ल्यांना प्रभावीपणे उत्तर दिलं आहे. आता भारताने पुन्हा काही कारवाई केली तर त्याला आणखी जोरदार प्रत्युत्तर देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.
यावेळी सिंधू पाणी कराराबाबत इशाक डार म्हणाले की, जगातील कुठलाही देश आपल्या वाट्याचं एक थेंबही पाणी सोडू इच्छित नाही. आम्हाला याबाबत एकत्र बसून बोलावं लागेल, असं प्रत्येकजण म्हणतोय. मात्र याबाबत कुठलीही चर्चा होत नाही आहे. भारत आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने या प्रकरणी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुलवामाच्या वेळीही त्यांनी असंच केलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.