Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज(8 मे) रात्री 9 च्या सुमारास अचानक भारतावर हल्ले सुरू केले. आधीपासून तयारीत असलेल्या भारतीय सैन्यानेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, भारताने फक्त पाकिस्तानचे हल्लेच हाणून पाडले नाही, तर पाकिस्तानात घुसून अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दहशतवादाचा जोरदार मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा जाहीर केला. जयशंकर यांनी ट्विट करून पाकिस्तानला कडक इशाराही दिला आहे. जर पाकिस्तानने भारतावर कोणताही लष्करी हल्ला केला, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर म्हणाले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या मानवाधिकार प्रमुखांशीही चालू घडामोडींवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की भारताने आपल्या कृतींमध्ये संयम बाळगला आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल. जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आज मी अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे मी मनापासून कौतुक करतो. दहशतवाद वाढवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.