पाकिस्तानने शुक्रवारी रात्री सीमाभागात ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्यात आला. यानंतर रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ले चढविले आहेत. पाकिस्तानचे तीन एअरबेससह इस्लामाबाद, लाहोरवर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्लीवर फतेह २ ही मिसाईल डागल्याचा दावा सरकारी सुत्रांनी केला आहे.
भारत - पाकिस्तान युद्धावर मोठी अपडेट येत आहे. पाकिस्तानने दिल्लीवर लांब पल्ल्याची फतेह २ मिसाईल डागली होती. पहाटे चारच्या सुमारास ही मिसाईल हरियाणाच्या सिरसाच्या आकाशात पोहोचली होती. ही मिसाईल हरियाणाच्या आकाशात आल्यावर भारतीय सैन्याने एअर डिफेन्सद्वारे ती पाडली आहे. यामुळे दिल्लीवरील मोठा हल्ला परतवून लावण्यात आला आहे. सिरसामधून अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये मोठा स्फोटाचा आवाज आणि स्फोटानंतरचा प्रकाश दिसत आहे. ही बॅलेस्टिक मिसाईल दिल्लीतील एक अती महत्वाच्या ठिकाणावर लक्ष्य करून डागण्यात आली होती.
भारताने पाकिस्तानवर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. ते रात्री १२ च्या सुमारास हल्ला परतवून लावल्यानंतर उठविण्यात आले. नागरिक हवी असेल तर लाईट चालू करू शकत होते. परंतू, आकाशात पुन्हा काही भागात ड्रोनच्या हालचाली दिसल्याने जालंधरसह पंजाबच्या काही भागात पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.
तीन एअरबेसवर भारताचा हल्ला...
भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोरकोट) हवाई तळांना लक्ष्य केले आहे, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लढाऊ विमानांमधून हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. आम्ही भारताच्या शक्तीला, युक्त्यांना किंवा हल्ल्यांना घाबरणारा समुदाय नाही. आता त्याने आपल्या उत्तराची वाट पाहावी, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.