श्रीनगर - भारतीय सशस्त्र दलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ आठवड्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर मिसाईल हल्ले करण्यात आले. त्यात दहशतवादी संघटना लश्कर ए मोहम्मदचा गड मानला जाणाऱ्या बहावलपूरचाही समावेश आहे. भारतीय सैन्याने टार्गेट शोधून नियोजितपणे हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून भारतीय सैन्यही अलर्ट आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर कारगिल युद्धातील हिरो होवित्जरला पुन्हा एकदा सीमेवर तैनात करण्यात आले आहे. बोफोर्स तोफेने कारगिल युद्धात त्याची ताकद सिद्ध केली होती. ऑपरेशन विजयमध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. कारगिल युद्धात भारताच्या यशाचे श्रेय तोफखान्याला जाते. बोफोर्स FH 77B हॉवित्जर, एक १५५ मिमी तोफ आहे जी तिच्या टार्गेट आणि रेंजमुळे महत्त्वाची भूमिका निभावते. ही तोफ शत्रूच्या बंकरला कमकुवत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कारगिल युद्धात ही तोफ सर्वात महत्त्वाची ठरली होती.
दोन लाखांहून अधिक गोळे आणि बॉम्ब डागले
कारगिल संघर्षात भारतीय तोफखान्यातून २ लाखाहून अधिक गोळे, बॉम्ब आणि रॉकेट डागण्यात आले. ३०० तोफा, मोर्टार, एमबीआरएलमधून प्रतिदिवशी ५ हजार गोळे, मोर्टार बॉम्ब आणि रॉकेट डागले होते. टायगर हिलवर कब्जा करण्यासाठी दिवसाला ९ हजार गोळे डागले. हल्ल्याच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी प्रत्येक आर्टिलरी बॅटरीने १७ दिवसापर्यंत सातत्याने प्रतिमिनिट एक राऊंडहून अधिक फायर केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात कधीही इतका दीर्घकाळ फायरिंग झाली नव्हती.
पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली
पाकिस्तानवर हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील सर्व एअरबेस अलर्टवर ठेवले होते. यामुळे पहाटेच हवाई दलाची विमाने हवेत झेपावली होती. पुण्याच्या एअरबेसवरूनही लढाऊ विमानांनी पुणे, मुंबईच्या आकाशात घिरट्या घातल्या. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एअरबेसवरून लढाऊ विमानांचा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर सराव सुरु होता. पश्चिमेकडे लोणावळ्यापलिकडेपर्यंत तर पूर्वेकडे फलटणच्या पलिकडेपर्यंत ही लढाऊ विमाने नेमहीच सराव करतात.