'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारतात आनंदाचं वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी झालेल्या कारवाईमुळे सर्वच जण खूप खूश आहेत. याच दरम्यान लोक जनशक्ती पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचं कौतुक केलं.
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं. आम्ही भारतीय सैन्याला सलाम करतो. आपल्या शांत झोपेमागे सैन्याचा पराक्रम आणि बलिदान आहे. दहशतवाद्यांचे अड्डे अत्यंत सावधगिरीने उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममधील हिंदूंवरील हल्ल्याचा बदला आहे. भारताच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं."
"आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
"मुरीदके आणि बहावलपूरच्या कँपमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं उघड झालं आहे. अशा परिस्थितीत, लष्कराने हुशारीने दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईदरम्यान सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली. सैन्यामुळे प्रत्येक भारतीयाला सुरक्षित वाटत आहे. भारतीय सैन्य अभिनंदनास पात्र आहे" असं शांभवी चौधरी यांनी म्हटलं आहे.
"मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या वडिलांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याने माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे असं म्हटलं. वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, आज मला खूप आनंद झाला आहे कारण आपल्या सैन्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ लोकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. आज त्या सर्व आत्म्यांना शांती मिळेल हे मला समाधान आहे. ही कारवाई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. हा न्यायाचा क्षण आहे.