Operation Sindoor: जम्मू-काश्मीर येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानला कठोर धडा शिकवला. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने सर्व हल्ले परतून लावत पाकच्या 11 लष्करी तळांचे मोठे नुकसान केले. यादरम्यान, बीएसएफनेही सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारालाही चोख प्रत्युत्तर दिले.
बीएसएफ जवानाचा सन्मानया कारवाईदरम्यान आपल्या जखमी साथीदारांना वाचवणाऱ्या एका शुर बीएसएफ जवानाचा इंडिगो विमानात सन्मन करण्यात आला. X वरील एका पोस्टमध्ये बीएसएफने म्हटले की, १० जून २०२५ रोजी इंडिगोच्या दिल्ली-बंगळुरुच्या क्रू मेंबर्सनी बीएसएफच्या १६५ बटालियनचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजप्पा बीडी यांचा सन्मान केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेल्या शौर्य आणि देशाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांना फ्लाइटमध्ये हा मान मिळाला. हा व्हिडिओ पोस्ट करताना बीएसएफने इंडिगोचे आभार मानले.
सहकाऱ्यांचे रक्षण करताना जखमीव्हिडिओमध्ये विमानाचे कॅप्टन सर्व प्रवाशांसमोर या जवानाचे कौतुक करताना दिसत आहेत. ते म्हणतात, 'या फ्लाइटमधील एका अतिशय खास प्रवाशाचा सन्मान करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ७ आणि ८ मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान जम्मू प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या जोरदार गोळीबारात बीएसएफचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजप्पा बीडी त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करताना गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या धाडसी कार्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो.' यानंतर सर्व प्रवासी उभे राहतात आणि टाळ्या वाजवून बीएसएफ जवान राजप्पा बीडी यांचे कौतुक करतात. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.