इंदूर : खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. इंदूर येथे आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.सुमित्रा महाजन यांचा ‘ताई' असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, लोकसभाध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांनी व मी अनेक वर्षे भाजपमध्ये एकत्र काम केले आहे. इंदूरच्या विकासाबाबत ताईंची सर्व स्वप्ने आम्ही पूर्ण करू. सुमित्रा महाजन यावेळी व्यासपीठावर होत्या.
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी निवडणुकीस उभे राहू नये, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यानुसार मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यंदा रिंगणात नाहीत. इंदूरमधून आठवेळा निवडून आलेल्या सुमित्रा महाजन ७६ वर्षे वयाच्या असून त्यांना आता उमेदवारी देऊ नये, असा पक्षनेतृत्वाचा विचार होता. उमेदवारीबद्दल बरेच दिवस काही कळविण्यात न आल्याने पक्षनेतृत्व हा निर्णय आपल्याला सांगण्यास संकोचत असावे, हे सुमित्रा महाजन यांच्या लक्षात आले. अखेर त्यांना याबाबत पक्षाला पत्र लिहावे लागले होते. (वृत्तसंस्था)