मागच्या काही काळात ऑनलाइन शॉपिंगमुळे वस्तूंची खरेदी करणं अगदी सोपं झालं आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या कुठल्याही वस्तू खरेदी करू शकता. मात्र वाढत्या ऑनलाइन शॉपिंगबरोबर काही धोकेही निर्माण होऊ लागले आहेत. यात फसवणूक होण्याची शक्यताही असते. अशीच एक घटना पाटणा येथे घडली आहे. येथे एका महिलेने मागवलेल्या वस्तूची वेळेत डिलिव्हरी न झाल्याने संबंधित कंपनीच्या कस्टमर केअर मदत मागितली. मात्र या प्रयत्नात तिला तब्बल ५२ हजार रुपयांचा गंडा घातला गेला.
पाटणामधील यारापूर येथे राहणाऱ्या मालती सिन्हा या महिलेने ६ फेब्रवारी रोजी एक ऑनलाइन मिक्सर मागवला होता. हा मिक्सर १२ फेब्रुवारीपर्यंत मिळणार होता. मात्र डिलिव्हरी न झाल्याने या महिलेने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने सर्च इंजिनमधून कंपनीचा नंबर शोधला.
तसेच त्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा समोरील व्यक्तीने त्यांना कंपनीच्या साईटवर त्यांचा क्रमांक अपडेट झाला नसल्याचे सांगितले. तसेच हा क्रमांक अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर स्कॅमर्सनी तिच्या खात्यामधून ५२ हजार रुपये लंपास केले.