General Upendra Dwivedi on Rudra Brigade: लडाखमधील द्रास येथे २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संबोधित करताना भारतीय सैन्याच्या भविष्यातील आराखडा सांगितला आहे. भविष्यात भारताची रुद्र ब्रिगेड शत्रूंसाठी धोकादायक ठरणार असल्याचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं. येत्या काळात भारतीय सैन्य अधिक शक्तिशाली होईल, असेही लष्करप्रमुख म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना भारताने दहशतवाद्यांचा पराभव केला असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
"ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे पाकिस्तानला थेट संदेश होता की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर होते, ज्याने संपूर्ण देशाला दुखावलं होतं. यावेळी भारताने या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि योग्य उत्तरही दिले. शत्रूला प्रत्युत्तर देणे आता न्यू नॉर्मल झाले आहे," असं जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं.
"सैन्यात रुद्र ब्रिगेडची स्थापना केली जात आहे. मी कालच त्याला मंजुरी दिली. याअंतर्गत, आपल्याकडे एकाच ठिकाणी इन्फन्ट्री, मेकॅनिकल इन्फन्ट्री, आर्मर्ड युनिट्स, तोफखाना, विशेष दल आणि मानवरहित एरियल युनिट्स असतील जे रसद पुरवतील. लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणाली स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होत असल्याने येत्या काळात सैन्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल," असं जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
"सैन्याने 'भैरव लाईट कमांडो' ही विशेष सेना तयार केली आहे. ही तुकडी सीमेवर शत्रूला आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. प्रत्येक इन्फंट्री बटालियनमध्ये आता एक ड्रोन प्लाटून आहे. तोफखान्यात 'शक्तीबान रेजिमेंट' तयार करण्यात आली आहे, जी ड्रोन, ड्रोनविरोधी उपकरणे आणि आत्मघाती ड्रोनने सुसज्ज असेल. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. विकास कामात सैन्य देखील योगदान देत आहे. याअंतर्गत लडाखसारख्या सीमावर्ती भागात विकास कामे केली जात आहेत," असेही जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त एक पोर्टलसह तीन प्रकल्प सुरू केले. लोक या पोर्टलद्वारे शहीदांना 'ई-श्रद्धांजली' देऊ शकतात.