पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन कटरा ते श्रीनगर, अशी धावेल. महत्वाचे म्हणजे, या ट्रेनच्या माध्यमाने पहिल्यांदाच काश्मीर खोरे उर्वरित भारताशी जोडले जाईल. वंदे भारत ला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाला भेट दिली आणि तेथे तिरंगा फडकावला. कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त, ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, 'माझे तर डिमोशन झाले आहे. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांत जम्मू आणि काश्मीरसाठी सुरू झालेल्या सर्व रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी मी पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहे, हे माझे भाग्य आहे. पहिला कार्यक्रम अनंतनाग रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचा होते. यानंतर दुसरा कार्यक्रम बनिहाल बोगद्याच्या उद्घाटनाचा होते. मला आठवते की २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनावेळी मीही उपस्थित होतो. आज स्टेजवर बसलेले सर्व ४ जण त्या दिवशीही तेथे होते. मनोज सिन्हा तेव्हा रेल्वे राज्यमंत्री होते. आता त्यांना जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून बढती देण्यात आली आहे. तर माझे डिमोशन झाले आहे. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे.' अशा प्रकारे त्यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'लवकरच परिस्थिती सामान्य होईल. मला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देतील. याशिवाय, हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि यासोबतच जम्मू-काश्मीरच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सक्रिय असल्याने आणि प्रत्येक क्षणी काश्मीरच्या विकासाचे अपडेट्स घेत असल्याने हा विकास शक्य झाला आहे,' असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले.