महाराष्ट्रासह देशभरात मागील काही दिवसांपासून माधुरी हत्तीणीचे प्रकरण चर्चेत आहे. कोल्हापूरातील नांदणी मठातून माधुरीला वनतारामध्ये नेल्यामुळे कोल्हापूरकर संतत्प आहेत. अशातच, ओडिसातून हत्तीशी संबंधित एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील अंगुल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक असे दृश्य पाहायला मिळाले, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांची झोप उडाली.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास जवळच्या जंगलातून १३ हत्तींचा एक मोठा कळप बाहेर पडला आणि थेट हुलुरिंगा परिसरात घुसला. रात्री अचानक इतक्या मोठ्या संख्येने आलेले हत्ती पाहून लोकांमध्ये घबराट पसरली. सुरुवातीला काही लोकांनी मशालीच्या मदतीने हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक १३ हत्ती एकामागून एक गावात शिरले. हे विचित्र दृश्य पाहण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले होते.
अनेक कुटुंबांनी तर भीतीने आपले दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. हा कळप सुमारे चार तास शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरत राहिला. सुदैवाने रात्रभर झालेल्या या गोंधळानंतरही कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. हे हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर पडले असावेत, असा अंदाज आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.