नाशिक : देशाच्या एकूण १२५ कोटींच्या लोेकसंख्येपैकी जवळपास ५२ टक्के म्हणजेच ६५ कोटी लोकसंख्या इतर मागास संवर्गाची (ओबीसी) असल्याचा दावा ऑल इंडिया बंजारा संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, देशात भटके विमुक्त जमातीची लोकसंख्या २२ कोटी आहे. तसेच बारा बलुतेदार आणि अति मागास संवर्गातील साधारणत: १८ कोटींच्या घरात लोकसंख्या आहे. देशात मंडल आयोग लागू करताना मंडल आयोगाचा एक सदस्य एल. आर. नाईक यांनी ओबीसींना सरसकट २७ टक्के आरक्षण देऊ नका, तर मागास आणि अति मागास असे विभाजन करून द्यावे, असे म्हटले होते. तोच धागा पकडून सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात २७ टक्के ओबीसींचे दोन किंवा तीन भाग करावे, असे सूचित केले होते आणि आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (दिल्ली) यांनी केंद्र सरकारकडे २७ टक्के ओबीसींचे तीन भाग करावे,अशी मागणी केली. या तीन भागात भटके विमुक्त एक, दुसरे अति मागास म्हणजेच तेली, माळी, कोळी, धनगर, गोवारी, आणि बारा बलुतेदार म्हणजे न्हावी, खाती, वाडी, लोहार, सुतार, शिंपी, धोबी, कुंभार आणि तिसरे म्हणजे केंद्रीय सूचीतील उरलेले इतर मागास यांना प्रत्येकी ९ टक्के आरक्षण देण्याची आमची मागणी असल्याचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ओबीसींची लोकसंख्या ६५ कोटी : हरिभाऊ राठोड
By admin | Updated: February 12, 2016 23:03 IST