Nupur Sharma, Prophet Case: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजी नमाजानंतर दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. यावेळी त्यांनी पोस्टर दाखवत नुपूर शर्माविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराजपासून सहारनपूरपर्यंत नमाजानंतर मुस्लिमांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले.
पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशीद परिसरात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात निदर्शने झाली. यावळी निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालच्या अटकेची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. याआधी गुरुवारी ओवेसींचा पक्ष एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी संसद पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली होती.
शाही इमाम म्हणाले- जामा मशिदीने निदर्शनासाठी बोलावले नव्हतेजामा मशिदीच्या शाही इमामाने सांगितले की, 'जामा मशिदीबाहेर अशी निदर्शने होणार होती हे त्यांना माहीत नव्हते. आम्ही जामा मशिदीने आंदोलन पुकारले नव्हते. जामा मशीद चौकात म्हणजे गेट क्रमांक एकवर काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. हे लोक कोण आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत,' असे ते म्हणाले.
नेमकं काय झालं?भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते.
दिल्ली पोलिसांची कारवाईदुसरीकडे नुपूर शर्माच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस कडक झाले आहेत. नुकतेच दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 32 जणांवर भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नुपूर शर्मा, नवीन जिंदाल, असदुद्दीन ओवेसी, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अन्सारी यांच्यावर दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटने अशोभनीय वक्तव्य करून वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. यती नरसिंहानंद, दानिश कुरेशी, विनिता शर्मा, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.