नवी दिल्ली : शहरातील आजादपूर मंडीत कोरोना संक्रमितांची संख्या अकरा झाली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी येथे ४ व्यापाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ७ रुग्णांची नव्याने वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.मंडईत वाढत असलेल्या संक्रमितांच्या संख्येमुळे व्यापारी मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नवीन संक्रमित रुग्ण हे फळ व भाजीपाला होलसेल विक्रेते व अडतदार व्यापारी आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. मंडईचा काही भाग सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिली.आजादपूर बाजार समितीचे सदस्य अनिल मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंडई ओस पडत चालली आहे. आवश्यक त्या सर्व खबरदाºया घेऊनही दिवसेंदिवस संक्रमितांची संख्या वाढतच आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. कोरोना संक्रमित व्यापाºयांच्या कुटुंबियांच्याही तपासण्या होणे आवश्यक आहे.।शेतमालाच्या व विक्रीसाठी बाहेरून आलेले शेतकरी, मजूर यांना कोरोनाची लागण झाली, तर त्याचा वेगाने फैलाव होईल, कारण अनेक शेतकरी, मजूर मालांची विक्री करून आपल्या गावी, घरी परत जात आहेत, असे मतही अन्य सदस्यांनी व्यक्त केले आहे.
आजादपूर मंडीतील संख्या अकरावर, व्यापारी व मजुरांमध्ये वाढतेय धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:44 IST