नवी दिल्ली : बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मेघालयातील पूरस्थिती जैसे थे असताना उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि बहराईीच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पुराने १७ जणांचा बळी घेतला. बाराबंकी, गोंदा, सिद्धार्थनगर, महाराजगंज जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराने थैमान घातले असून, या जिल्ह्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.बिहारमधील अधिकच गंभीरअसून,पुराच्या तडाख्याने आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांतील ९३ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बहुतांश भागातील जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाला परीक्षा रद्द करणे व काही मार्गांवरील रेल्वे वाहतूक बंद करणे भाग पडले आहे.नेपाळ आणि बिहारच्या उत्तरेकडील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराचा जोर वाढला आहे. बुधवारपर्यंत मृतांचा आकडा ७२ होता. तो आता ९८ वर गेला आहे. सहारसा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत सात जण पुरात वाहून गेले. मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. बहराईचमध्ये मागील तीन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला. घागरा आणि शरयू नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापोर, पश्चिम मिदनापोर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगली आणि झारग्राम जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
उत्तर, पूर्व भारतात पुराचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:08 IST