एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:45 AM2019-11-19T01:45:19+5:302019-11-19T01:45:23+5:30

भाजप म्हणतो आमच्या यशाला ते धक्का लावू शकत नाहीत

No space allocation due to AJSU | एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

Next

जमशेदपूर (झारखंड) : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होऊ न शकल्याचा ठपका भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनवर (एजेएसयू) सोमवारी ठेवला. राज्यात विधानसभा निवडणुकीत एजेएसयू दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता भाजपच्या यशाला काही धक्का लावू शकत नाही, असा दावा झारखंड भाजपचे अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी केला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एजेएसयूला आठ जागा दिल्या होत्या व यावेळी १३ ते १४ जागा देण्याची भाजपची तयारी होती. परंतु एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश महातो हे १८ ते २२ जागाच मिळाल्या पाहिजेत, असे अडून बसले होते, असे गिलुआ म्हणाले. महातो यांनी मात्र आमच्या पक्षाने भाजपकडे १७ उमेदवारांची यादी विचारार्थ पाठविली होती, असे म्हटले.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला तसाच मान मिळाला पाहिजे व त्यांनी (एजेएसयू) त्या प्रमाणात जागा वाटप मान्य केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी एजेएसयू हा प्रादेशिक पक्ष असल्याचा उल्लेख केला. राज्यात ८१ सदस्यांच्या विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने ७३ उमेदवारांची तर एजेएसयूने २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे १९ मतदारसंघांत रालोआतील भाजप व एजेएसयू हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. असे असले तरी भाजप किंवा एजेएसयूपैकी एकानेही आम्ही अधिकृतरीत्या वेगळे झालेलो आहोत, असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीनंतर आघाडी करण्यास त्यांनी जागा ठेवली आहे.

१५ नोव्हेंबर, २००० रोजी बिहारमधून झारखंड राज्य वेगळे केले गेले तेव्हापासून भाजप आणि एजेएसयू मित्र आहेत. तेव्हा महातो हे गृह मंत्रालयासह उपमुख्यमंत्रीपदावर होते. महातो यांचा २०१४ मध्ये सिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आणि त्याच मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते जिंकू शकले नाहीत.

भाजपने तिकीट नाकारले, सरयू रॉय यांचा दावा
जमशेदपूर : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राज्याचे माजी मंत्री सरयू रॉय यांनी भाजपने त्यांना तिकीट नाकारण्यांच्या कारणांपैकी एक माझी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेली जवळीक असावी, असे दिले आहे.
उमेदवारांची यादी अंतिम केलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या किमान तीन सदस्यांनी मला सांगितले की, नितीशकुमार यांच्या हस्ते २०१७ मध्ये माझ्या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशनामुळे मला पक्षाने तिकीट नाकारले असण्याची दाट शक्यता आहे, असे रॉय यांनी सांगितले.
रॉय म्हणाले, नितीश कुमार हे जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत आले व त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे मला तिकीट का नाकारले हे समजत नाही. रॉय यांनी जो काही दावा केला त्याबद्दल भाजपकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.

Web Title: No space allocation due to AJSU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.