कोलकाता : महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आदर नसलेले आता ‘सोनार बांगला’ची भाषा बोलत आहेत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. सध्या बंगालची अस्मिता संपवण्याचे ठरवून प्रयत्न सुरू आहेत. हे हिंसाचार आणि विभाजनवादी राजकारण थांबले पाहिजे, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी बीरभूम जिल्ह्यातील बोलापूर येथील रॅलीमध्ये केले.
रॅलीमध्ये बॅनर्जी म्हणाल्या की, रवींद्रनाथ टागोर यांनी काही दशकांपूर्वीच सोनार बांगला (सोनेरी बंगाल) निर्माण केला होता. भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणापासून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे. भाजप विश्वभारती युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या म्हणाल्या की, विश्वभारती युनिव्हर्सिटीच्या निमित्ताने गलिच्छ राजकारण केले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली विद्वेष पसरवला जात आहे. युनिव्हर्सिटीचे कुलगुरु हे भाजपचे आहेत.
जातीय राजकारणासाठी ते युनिव्हर्सिटीची प्रतिमा मलिन करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची खरेदी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, पैशाच्या बळावर भ्रष्ट आमदारांची खरेदी करून आमच्या पक्षाची पाळेमुळे नष्ट करता येणार नाहीत.
ते जेवण फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी यावेळी प्रखर टीका केली. त्या म्हणाल्या की, अलीकडेच अमित शहा यांनी बंगालच्या ख्यातनाम लोकसंगीतकारांच्या घरी जेवण घेतले. परंतु हा केवळ देखावा होता. त्यांनी त्यावेळी घेतलेले जेवण भाजप नेत्यांनी फाइव्ह स्टार हॉटेलातून आणलेले होते.