Nitin Gadkari, Cashless Treatment Scheme : नवी दिल्ली : केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांना मोठा दिलासा देणार आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.
('लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी सरकारने नवी योजना सुरू केली आहे. याला कॅशलेस उपचार असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मंगळवारी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी यांसदर्भात माहिती दिली. नितीन गडकरी म्हणाले की, काही राज्यांमध्ये कॅशलेस उपचार हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आला होता. आता त्यातील सर्व त्रुटी दूर करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा फायदा पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे.
यासोबतच, हिट अँड रन प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांपर्यंतची भरपाईही मिळणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, २०२४ मध्ये रस्ते अपघातात जवळपास १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावल्याची चिंताजनक आकडेवारी सांगत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य रस्ते सुरक्षा असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, ३० हजार लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाला आहे. ६६ टक्के अपघात हे १८ ते ३४ वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.