नवी दिल्लीः निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत आहे. न्यायाधीश सुरेश कैत यांच्यासमक्ष ही सुनावणी होत असून, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली आहे. सॉलिसिटर जनरल युक्तिवाद करताना म्हणाले, दोषी कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. दोषी पवन जाणूनबुजून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करत नाहीत. ते सर्व विचारपूर्वक असं करत आहेत. दोषी पवन गुप्ता एकाच वेळी दोन अधिकारांचा वापर करत आहेत.2017मध्ये दोषी पवननं 225 दिवसांनंतर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. क्युरेटिव्ह पिटिशन आणि दया याचिका अजूनपर्यंत दोषींकडून दाखल करण्यात आलेली नाही. दोषीनं जर 90 दिवसांच्या आत याचिका दाखल केली नाही, तर त्यांना फासावर चढवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असंही तुषार मेहतांनी स्पष्ट केलं आहे.
निर्भया प्रकरणात ज्यांचे कायदेशीर पर्याय संपलेत, त्यांना फासावर लटकवा, केंद्राची न्यायालयाला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 17:07 IST