भोपाळ - विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आल्याने मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्यावर चुरहट मतदार संघात दगडफेक झाली होती. या प्रकरणी काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांची यात्रा चुरहट विधानसभा मतदारसंघातील परपरा गावात आली असताना चौहान यांच्या यात्रेवर अज्ञातांनी हल्ला केला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली. याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, "या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे."
शिवराज सिंह चौहान यांच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नऊ पदाधिकाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 17:49 IST