नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतला असून, अतिरेकी कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग दिला आहे, तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशीही करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी संस्थेने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर रविवारी जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आणि तपासकामात अनेक पथके उतरवली आहेत. मागील मंगळवारी दुपारी झालेल्या अतिरेक्यांच्या निर्घृण हल्ल्यात २६ जण ठार झाले. त्यानंतर एनआयएच्या महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. बारीकसारीक पुरावे गोळा करण्यासाठी पथक बुधवारपासूनच हल्ल्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहे.
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
एनआयएने निवेदनात म्हटले आहे की, या संपूर्ण घटनाक्रमाची तपशीलवार माहिती घेण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची सखोल चौकशी केली जात आहे. अतिरेक्यांबाबत बारीकसारीक माहिती मिळवण्यासाठी अतिरेकी जेथून आले व जेथून गेले त्या जागेची तपासणी करण्यात येत आहे. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, अतिरेक्यांच्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी पुरावे मिळवले जात आहेत. यासाठी फॉरेन्सिक व अन्य तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
तीन दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी सोडला देश
भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना दिलेली तीन दिवसांची मुदत रविवारी संपली. या मुदतीत ५३७ पाक नागरिकांनी देश सोडला. अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी पतरणाऱ्या पाक नागरिकांमध्ये ९ वकिलातीतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर भारतीय वकिलातीतील १४ अधिकाऱ्यांसह ८५० भारतीय नागरिक अटारी-वाघा सीमा पार करून मायदेशी परतले आहेत.
हल्ला करताना अतिरेक्यांनी केला बॉडी कॅमेऱ्याचा वापर
अतिरेक्यांनी निरपराध लोकांना ठार मारण्याचे कृत्य करताना बॉडी कॅमेऱ्याचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अतिरेक्यांबाबत माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
हल्लेखोर अतिरेक्यांमध्ये तीन पाकिस्तानींचा समावेश
सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यात सामील असणाऱ्या अतिरेक्यांची रेखाचित्रेही जारी केली आहेत. यात तीन पाकिस्तानी असून आसिफ फौजी, सुलेमान शाह व अबू तल्हा अशी या अतिरेक्यांची नावे आहेत.
२२ तास पायी चालत आले? एके-४७, एम-४ असॉल्ट रायफल्सचा वापर
तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सुमारे २० ते २२ तास जंगलांमध्ये प्रवास करून बैसरन घाटीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी हल्ला केला.
फॉरेन्सिक तपासात उघड झाले आहे की, दहशतवाद्यांनी अत्याधुनिक एके-४७ आणि एम-४ असॉल्ट रायफल्सचा वापर केला होता. घटनास्थळी सापडलेली काडतुसे या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुरावे म्हणून समोर आली आहेत.
महाराष्ट्र, ओडिशातील नागरिकांचे जबाब
एनआयएच्या पथकाने महाराष्ट्र, ओडिशा व पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतील पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत.
प्रारंभिक तपासानुसार, अतिरेकी हल्ल्यात सामील असलेल्या अतिरेक्यांची संख्या पाच ते सात होती, असे पुढे आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण, तसेच किमान दोन स्थानिक अतिरेक्यांकडून मदत मिळाली होती.
आधी दुकानांच्या मागे लपले, मग समोर येऊन केला हल्ला
दहशतवादी हल्ल्याचा मुख्य साक्षीदार समोर आला असून, तो एक स्थानिक छायाचित्रकार आहे. हल्ल्यावेळी तो एका झाडावर चढून संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचे चित्रीकरण करत होता. या छायाचित्रकाराने घेतलेल्या व्हिडिओमध्ये या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असे एनआयएला वाटते.
त्याने केलेल्या रेकॉर्डिंगनुसार, सुरुवातीला दोन दहशतवादी दुकानांच्या मागे लपलेले होते. हेच दहशतवादी सर्वात आधी बाहेर आले आणि त्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी चार लोकांवर गोळ्या झाडल्या. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी इकडेतिकडे पळायला सुरुवात केली.
याच दरम्यान इतर दहशतवादी झिपलाइनच्या जवळून बाहेर आले आणि गोळीबार सुरू केला.