श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू असून, शुक्रवारपासून पुढचा आठवडा काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारची नमाज आणि सोमवारी बकरी ईद असल्याने संचारबंदी काही काळासाठी शिथील करण्यात येणार आहे. मात्र या काळात कलम ३७० हटवण्याबाबत काश्मिरींच्या जनमानसाचा अंदाज येणार आहे. दरम्यान, राज्यात शांतता कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांनी सुद्धा चोख रणनीती आखलेली आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये पाच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहेत. त्यामुळे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर या काळात काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती राहील. यावर सुरक्षा यंत्रणा आणि केंद्र सरकारची करडी नजर आहे. ९ ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाचा वर्धापन दिन आहे, त्याच दिवशी शुक्रवारची नमाज असेल. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. तसेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, त्यानिमित्त १३ ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या दिवशी काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न होत असतो.
उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:55 IST