उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झाशीमध्ये वडील आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन पाच तास तिचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. मात्र ते आपल्या बाळाला वाचवू शकले नाहीत. नवजात मुलीचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधून हे प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनी आरोप केला की, उपचाराअभावी त्यांच्या नवजात बाळाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.
ललितपूर जिल्ह्यातील मदवारा पोलीस स्टेशन परिसरातील तलऊ गावातील रहिवासी असलेल्या सोनू परिहारने सांगितलं की, नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी तो सुमारे ५ तास रुग्णवाहिकेतून फिरत होतो. मुलीला झाशी जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं नाही. ज्यामुळे नवजात मुलीचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी पत्नीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्रथम पत्नीला ललितपूर जिल्हा रुग्णालयात घेऊन गेला.
तिथे पत्नीचं ब्लड प्रेशर वाढत होतं आणि तिची प्रकृती बिघडत होती, त्यानंतर डॉक्टरांनी तिला झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं. रात्री २ वाजता तो झाशी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला. सकाळी ७ च्या सुमारास ही शस्त्रक्रिया झाली. पत्नीने एका मुलीला जन्म दिला. जन्मानंतर मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता.
सोनूच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मेडिकल कॉलेजच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये एकही व्हेंटिलेटर रिकामा नाही. त्यामुळे डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. मुलीचे वडील सोनू एका खासगी रुग्णवाहिकेतून नवजात बाळाला घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी बेड रिकामा नसल्याचं कारण देत त्याला परत मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. जेव्हा वडिलांनी मुलीला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यास सांगितलं तेव्हा तिथेही नकार देण्यात आला. ज्यामुळे निष्पाप नवजात बाळाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.