कोणत्याही कामात कठोर परिश्रम केले तर यश निश्चित आहे असं म्हणतात. मजूर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचीही अशीच गोष्ट आता समोर आली आहे. लोकांच्या घरी विटा वाहून नेण्यासाठी त्याला दररोज ३०० रुपये मिळत असत. मजूर म्हणून काम करत असतानाही त्याने कधीही अभ्यास आणि शिक्षण सोडलं नाही. याच कारणामुळे आज तो नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.
नीट परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात पण सर्वांनाच यश मिळत नाही. जर कोणी कठोर परिश्रम केले तर यश मिळू शकतं. पश्चिम बंगालच्या २१ वर्षीय सरफराज आज तरुणांसाठी एक आदर्श ठरला आहे.
विटा उचलून दिवसाला ३०० रुपये कमवत असूनही, सरफराज डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. सरफराजने NEET २०२४ च्या परीक्षेत ७२० पैकी ६७७ गुण मिळवले. तो सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत मजूर म्हणून काम करायचा आणि नंतर संध्याकाळी अभ्यास करायचा. अनेकांनी त्याची थट्टा केली आणि त्याच्या क्षमतेवर शंका घेतली, परंतु सरफराजने त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि यश मिळवलं.
गंभीर अपघातामुळे ध्येय सोडावं लागलं
सरफराजला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होतं, पण एका गंभीर अपघातामुळे त्याला आपलं ध्येय सोडावं लागलं. कोविड दरम्यान, त्याने अभ्यास करण्यासाठी एक फोन खरेदी केला, तोही उधारीवर घेतला होता. पैशांअभावी त्याने फिजिक्स वाला नावाच्या ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन कोचिंग घेतलं.
डॉक्टर झाल्यानंतर गरजू लोकांची मोफत सेवा
एका मुलाखतीदरम्यान सरफराजने सांगितलं की तो सकाळी ६ वाजता उठून कामावर जायचा. मग तो दुपारी २ वाजता घरी अभ्यासासाठी परत जायचा. तासभर झोपल्यानंतर, ऑनलाइन लेक्चर पाहून अभ्यास करायचो आणि रिव्हिजन करायचो. तसेच मागील वर्षाचे प्रश्न सोडवायचो. डॉक्टर झाल्यानंतर तो अशा लोकांवर मोफत उपचार करेल ज्यांना उपचाराचा मोठा खर्च परवडत नाही.