ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्त एनडीएतील खासदारांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या सात रोसकोर्स येथील निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त मोदींनी थेट खासदारांशी संवाद साधला. यावेळी जनतेला सरकारी योजनांबाबत माहिती देण्याबाबत मोदींनी मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छता अभियान आणि ग्राम दत्तक योजना अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील अशी चर्चाही या निमित्ताने करण्यात आली. मोदींव्यतिरिक्त इतरअरुण जेटली आणि नितीन गडकरी या भाजपा नेत्यांसह इतर पाच मंत्र्यांनी आपल्या विकासात्मक संकल्पनांचे प्रेझेंटेशन दिले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते लाकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी व शिवसेना नेते अनंत गीतेंसह इतर खासदारही उपस्थित होते. तसेच मोदींचे संदेश हे देशातील नागरिकांच्या हिताचे असतात असे भाजपाचे खासदार किर्ती आझाद यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमानिमित्त व्यंकय्या नायडु यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. शिवसेना नेते कृपाल तुमाने यांना कार्यक्रमाबद्दल विचारले असता आज महाराष्ट्राबाबात कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसून हा कार्यक्रम चहापानाचा आहे असे त्यांनी सांगितले.