Nayab Singh Saini Yamuna River : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात यमुनेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अलीकडेच आप प्रमुख अरविंद केजरीवालांनी हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि आप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पण्या सुरू आहेत. आता याच पार्श्वभूमीवर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी त्यांच्या पल्ला गावात पोहोचले आणि यमुनेचे पाणी प्यायले. हा व्हिडिओही समोर आला आहे.
अरविंद केजरीवालांच्या आरोपानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सीएम सैनींना सोबत पल्ला घाटावर जाऊन यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर, हरियाणाचे मुख्यमंत्री एकटेच दिल्लीतील पल्ला गावात पोहोचले यमुना नदीचे पाणी प्यायले. याशिवाय, त्यांनी आतिशी यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना आप सरकारवर जोरदार टीकाही केली. आपच्या डमी (खड़ाऊं) मुख्यमंत्री आतिशी मार्लेनाजी, पल्ला गावातील यमुनेच्या किनाऱ्यावर तुमचे स्वागत आहे. हरियाणातून दिल्लीला येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात तर विष नाही, पण तुमच्या डोक्यात नक्कीच विष भरलंय. तुमचे अपयश झाकण्यासाठी हरियाणा सरकारवर आरोप करता, अशी टीका सैनी यांनी केली.
अरविंद केजरीवालांचे वक्तव्य दुर्दैवीसीएम सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, अरविंद केजरीवालांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारचे भितीदायक वक्तव्ये केले आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आज मी पवित्र यमुना मातेच्या चरणी आलो आहे. भाजप सरकारने विष मिसळले, असे ते म्हणाले होते. मी आज हे यमुनेचे पामी प्यायलो, पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे. हे पाणी दिल्लीत गेल्यावर दुषित होते. याचे कारण म्हणजे, केजरीवालांनी 10 वर्षांत एकही ट्रीटमेंट प्लांट लावला नाही. मी यमुना स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण त्यांनी काहीच केले नाही.