ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणा-या नौदलातील एका जवानाला नौदलातील वरिष्ठ अधिकारी मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संबंधीत जवानाच्या पत्नीने केला आहे. माझ्या पतीला शिक्षा म्हणून मनोरुग्णालयात ठेवल्याचा दावाही तिने केला आहे.
नौदलाच्या पूर्व नेव्हल कमांडअंतर्गत येणा-या आयएनएस कोट्टाबोमन या नौकेवर ड्यूटीवर असताना सुनील कुमार साहू या कर्मचा-याने नौदलाच्या अधिका-यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी नौदलाने चौकशीचे आदेश दिले असले तरी हुडहुड चक्रीवादळाचा फटका बसल्याने चौकशी संथगतीने सुरु आहे. मात्र साहू यांनी कोच्चीतील नौदलाचे रुग्णालय आयएनएस संजीवनीमध्ये दाखल करण्यात आले आहे. 'सुनीलकुमार यांना दोन दिवसी कोठडीत बंद ठेवण्यात आले व २३ ऑक्टोंबरला त्यांना कोणताही आजार नसताना रुग्णालयात दाखल केले असा आरोप सुनीलकुमार यांची पत्नी आरती यांनी केला आहे. सुनीलकुमार यांना मनोरुग्ण विभागात ठेवल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नौदलाच्या अधिका-यांनी सुनीलकुमार यांना उपचारासाठी नव्हे तर फक्त तपासणीसाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे असा दावा केला. माझ्या पतीला तातडीने रुग्णालयातून डिस्चार्ज द्यावा, त्यांना काही आजार असल्यास मी त्यांच्यावर एखाद्या खासगी रुग्णालयात उपचार करीन पण नौदलाच्या डॉक्टरांवर माझा काडीमात्र विश्वास नाही असे आरती यांनी म्हटले आहे.