ओडिशात रविवारी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. मयूरभंज जिल्ह्यात आलेल्या भीषण वादळ आणि चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, क्षणात २०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.
१२ गावांना वादळाचा तडाखा
मयूरभंज जिल्ह्यातील १२ गावांमध्ये या वादळाने सर्वाधिक नुकसान केले आहे. वेगवान वाऱ्यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब जमिनीदोस्त झाले आहेत. नॅशनल हायवे २२० वर आलेल्या भीषण बवंडरमध्ये पी. नाईक (५४) आणि मालती महंत (४५) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोक किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमींना क्योंझर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
प्रशासन युद्धपातळीवर सतर्क
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागाने बाधित गावांकडे धाव घेतली आहे. मदत आणि पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ओडिसा सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'
धोका अजून टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने मयूरभंज जिल्ह्यासाठी आज (सोमवार) 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट, वीज कोसळणे आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय सुंदरगड, क्योंझर, बालासोर आणि भद्रक जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांनाही इशारा
येत्या २४ तासांत रायगडा, कोरापुट, मलकानगिरी, पुरी, खुर्दा, नयागड, गंजम आणि गजपती जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Summary : A severe cyclone ravaged Odisha's Mayurbhanj district, killing two and destroying over 200 homes. Twelve villages suffered extensive damage with fallen trees and power outages. Authorities are providing relief, and weather alerts are in place for more districts.
Web Summary : ओडिशा के मयूरभंज जिले में भीषण चक्रवात से दो लोगों की मौत हो गई और 200 से अधिक घर नष्ट हो गए। बारह गांवों में भारी नुकसान हुआ, पेड़ गिर गए और बिजली गुल हो गई। अधिकारी राहत प्रदान कर रहे हैं, और कई जिलों में मौसम अलर्ट जारी किया गया है।