ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नाव चुकवल्याने डीडी न्यूजच्या वृत्तनिवेदिकेला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. डीडीवरील शी जिनपिंग यांचा उल्लेख अकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला थेट नोकरीलाच मुकावे लागले आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सध्या भारत दौ-यावर आहेत. बुधवारी रात्री डीडी न्यूजवरील बातम्यांमध्ये एका वृत्तनिवेदिकेने शी जिनपिंग यांच्या नावाचा उल्लेख ११ वे जिनपिंग असा केला.इंग्रजीमध्ये शी जिनपिंग यांचे नाव XI Jinping असे लिहीले जाते. वृत्तनिवेदिकेने XI या शब्दाचा उच्चार अकरावे जिनपिंग ( रोमन आकड्यानुसार XI म्हणजे अकरा) असा केला. लाईव्ह कार्यक्रमात हा गोंधळ घातल्याने त्या वृत्तनिवेदिकेला कामावरुन काढून टाकल्याची माहिती डीडीमधील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
डीडी न्यूजमध्ये वृत्तनिवेदक आणि अन्य जागा रिक्त असल्याने कंत्राटी तत्त्वावर वृत्तनिवेदक भरले जातात. संबंधित वृत्तनिवेदिकाही कंत्राटी तत्त्वावर काम करत होती असे समजते. मात्र शी जिनपिंग यांच्या नावात गोंधळ उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही परदेशतील अनेक वृत्तनिवेदकांचा शी जिनपिंग यांचे नाव वाचताना गोंधळ उडाला आहे.