चार वर्षांत ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

By Admin | Published: October 9, 2015 05:14 AM2015-10-09T05:14:32+5:302015-10-09T05:14:32+5:30

देशात सन २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात ११ अणू शास्त्रज्ञांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या

The mysterious death of 11 atom scientists in four years | चार वर्षांत ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

चार वर्षांत ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात सन २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात ११ अणू शास्त्रज्ञांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.
विभागाच्या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात कार्यरत आठ शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा स्फोटात, समुद्रात बुडून वा गळफास लावून मृत्यू झाला. हरियाणाचे रहिवासी राहुल सेहरावत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याबाबत माहिती मागितली होती. राहुल यांच्या अर्जाच्या उत्तरादाखल अणुऊर्जा विभागाने उपरोक्त माहिती दिली आहे.
अणुऊर्जा मंडळाच्या तीन अधिकाऱ्यांचाही याकाळात संशयास्पद मृत्यू झाला. यापैकी दोघांनी कथितरीत्या आत्महत्या केली होती तर अन्य एकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
बार्क, ट्रॉम्बेच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत सन २०१० मध्ये दोन संशोधन सहकाऱ्यांचा रहस्यमय स्थितीत लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. एफ श्रेणीच्या एका शास्त्रज्ञाची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपीचा छडा लागू शकलेला नाही. आरआरसीएटीच्या ड श्रेणीच्या एका शास्त्रज्ञानेही कथितरीत्या आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची फाईलही पोलिसांनी बंद केली. कल्पकममध्ये कार्यकत आणखी एका शास्त्रज्ञाने २०१३ मध्ये कथितरीत्या समुद्रात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली होती.
मुंबईतील एका अन्य शास्त्रज्ञानेही कथितरीत्या गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. आणखी एका शास्त्रज्ञाने कथितरीत्या कर्नाटकच्या कारवारमध्ये काली नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैयक्तिक कारणांतून ही आत्महत्या झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. (प्रतिनिधी)

- बार्क, ट्रॉम्बेमध्ये कार्यरत क-श्रेणीच्या दोन शास्त्रज्ञांचे मृतदेह २०१० मध्ये त्यांच्या निवासस्थानी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले होते. तर रावतभाटामध्ये याच गटाचा अन्य एक शास्त्रज्ञ २०१२ मध्ये त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आला होता. बार्कच्या एका प्रकरणात दीर्घ आजारामुळे शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. तर अन्य प्रकरणांचा अद्यापही तपास सुरूआहे.

Web Title: The mysterious death of 11 atom scientists in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.