Shivling Found in Chandauli: उत्तर प्रदेशातील चंदौली येथे हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे एक अद्भुत उदाहरण श्रावणच्या महिन्यात पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबाच्या जमिनीत उत्खनन करताना एक शिवलिंग सापडले. शिवलिंगाची माहिती मिळताच प्रशासन आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमले आणि शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांची भक्ती आणि श्रद्धा पाहून मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या जमिनीचा काही भाग मंदिर बांधण्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरु झालीय.
उत्तर प्रदेशातील चंदौलीतल्या या प्रकरणाने धार्मिक सलोखा, बंधुता आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे एक नवीन उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. ही जमीन धापरी गावातील सकलेन हैदर यांची आहे. त्यांनी जमिनीचा मोठा भाग त्यांचे नातेवाईक अख्तर अन्सारी यांना देण्याचा निर्णय घेतला होता. अख्तर जमिनीसाठी भिंत बांधण्यासाठी पाया खोदत होते. या खोदकामादरम्यान तिथे एक शिवलिंग सापडले. त्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि जवळच्या मंदिरात शिवलिंग ठेवण्यात आलं.
गावात शिवलिंग सापडल्यामुळे ज्या ठिकाणी ते सापडलं तिथे एक शिवमंदीर बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. हे पाहून सकलेन हैदर आणि त्यांच्या नातेवाईकांनी मंदिरासाठी जमिनीचा काही भाग मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. "माझे पूर्वजही इथे राहत होते. मीही इथेच राहतो. आमचे इथे घर, शेती आणि इमामबारा आहे. इमामबाराशेजारी एक जमीन होती. मी ती माझ्या मावशीच्या मुलाला अख्तर अलीला द्यायचे ठरवलं होतं. जमिनीवर भिंतीचे काम सुरू होते. खोदकामादरम्यान, आम्हाला कळलं की तिथे एक शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर, आम्ही मंदिराच्या नावावर जमीन देण्याचा निर्णय घेतला," असं सकलेन हैदर म्हणाले.
"हा त्यांच्या श्रद्धेशी संबंधित विषय आहे. गावातील सर्व लोक मोहरम, ईद, होळी आणि दिवाळी एकत्र साजरे करतात. म्हणून, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, आम्ही जमीन मंदिरासाठी सोडण्याचा निर्णय घेतला," असेही हैदर म्हणाले.
हैदर कुटुंबाच्या या निर्णयाचे गावातील लोकांनी जोरदार स्वागत केले आहे. २८ जुलै रोजी सकाळी श्रावणी सोमवार असल्याने गावातील काही महिलांनी मंदिरातून शिवलिंग उचलले आणि जिथे ते सापडले त्याच ठिकाणी पुन्हा ठेवले. यानंतर गावातील लोकांनी तिथे पूजा करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील लोकही तिथे जमा व्हायला लागले. आतापर्यंत हजारो लोकांनी तिथे येऊन जलाभिषेक केला. गावातील महिला भजन-कीर्तनही करत आहेत.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने घटनास्थळी फौजफाटा तैनात केला आहे. प्रशासन आणि पोलिस अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण पूजा शांततेत सुरू आहे.