नव्या वक्फ कायद्याविरोधातील आंदोलनातून हिंसाचार उफाळलेल्या पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दैनंदिन जीवन आता पूर्वपदावर येत आहे. तसेच येथील रहिवासीही शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, या हिंसाचाराप्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी कोलकाता हायकोर्टासमोर धक्कादायक माहिती आली आहे. मुर्शिदाबातमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर तेथील अनेक हिंदू रहिवाशांना लक्ष्य करण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. त्यातच आता आमच्यावर बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा, अशी विनवणी येथील महिला दंगेखोरांना करत होत्या, असे हायकोर्टातील सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.
भाजपा नेत्या आणि वकील प्रियंका टिबरेवाल यांनी मुर्शिदाबादमधील हिंसाचारात होरपळलेल्या अनेक पीडितांची हृदयद्रावक कहाणी कोर्टासमोर मांडली. त्या म्हणाल्या की, ‘’दंगेखोरांनी आमच्या तुळशीच्या माळा तोडल्या, असे फोनवर संवाद साधताना मुर्शिदाबादमधील महिलांनी मला सांगितले. दंगेखोरांच्या दहशतीमुळे या महिला भयग्रस्त झाल्या होत्या. हवंतर आमच्यावर बलात्कार करायचा असेल तर करा, पण आमच्या पती मुलांना सोडा, अशी विनवणी या महिलांनीं दंगेखोरांना केली होती. जेव्हा बांगलादेश मुक्त झाला तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. मात्र भारतामध्ये असं काही पाहावं लागेल, असं वाटलं नव्हतं. आग भडकवण्याऐवजी ती शांत केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या हिंसाचाराने पीडित व्यक्ती आता मुर्शिदाबाद येथे राहत नाहीत का? असे न्यायमूर्ती सौमेन सेन यांनी विचारले असता प्रियंका टिबरेवाल यांनी सांगितले की, हे पीडित आता मुर्शिदाबादमध्ये राहत नाहीत. त्यांना मालदा येथे आश्रय घेतला आहे. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत ते परत जाऊ शकत नाही. त्यांच्याकडील सारंकाही जळून खाक झालं आहे. एनएचआरसीच्या पथकाला तिथे जायचं आहे. मात्र त्यांना तिथे का जायचं आहे, ते आम्हाला माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रियंका टिबरेवाल यांनी सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, हा हिंसाचार बाहेरून आलेल्या लोकांनी घडवला असा दावा ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र सीमेवर कुंपण घालण्यासाठी त्या जमीन देऊ शकत नाही आहेत. सीमारेषेवर अशा प्रकारचं कुंपण घातलं जात नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. सीमारेषेवरील भागात अशा घटनांना रोखण्यासाठी कुंपण घालण्याची आवश्यकता आहे.
तर राज्य सरकारचे वकील कल्याण बंडोपाध्याय यांनी कोर्टात सांगितले की, मुर्शिदाबादच्या काही भागांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. काही सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. खोट्या अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक सोशल मीडिया पोस्ट बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.