- विकास झाडेनवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातून सुस्कारा घेत असतानाच दिल्लीपुढे काळ्या बुरशीचे मोठे संकट उभे आहे. आतापर्यंत ५५० रुग्णांची नोंद झाली असून, २५० रुग्ण भरती आहेत.दिल्ली सरकारने केलेल्या नोंदीनुसार काळ्या बुरशीचे संक्रमण झालेले दररोज सुमारे २५ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) या आजाराने संक्रमित झालेले २५ रुग्ण जीटीबी आणि लोकनायक या शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ‘एम्स’मध्ये १५० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली आहे जीटीबी रुग्णालयाचे चिकित्सा प्रमुख डॉक्टर बी. एल. शेरवाल म्हणाले, आमच्याकडे काळ्या बुरशीचे संक्रमण झालेले ५० रुग्ण भरती झालेआहेत. लोकनायक रुग्णालयाचे डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात ४७ रुग्ण उपचार घेत आहेत. ‘एम्स’मध्ये दररोज १० ते १५ रुग्ण भरती होत आहेत.
संसर्ग वाढत आहे काळ्या बुरशीचे संक्रमण वाढत आहे; परंतु त्यांना योग्य उपचार उपलब्ध नाही. सर गंगाराम रुग्णालयात ६० रुग्ण उपचार घेत आहेत, परंतु रुग्णांसाठी लस उपलब्ध होत नसल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.काळी बुरशीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, या रुग्णांसाठी केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु, याकरिता केंद्राकडून औषध पुरवण्यात आलेले नाही.दिल्लीत जवळपास ५०० रुग्ण आहेत. एका रुग्णाला दररोज ४ औषधी अत्यावश्यक आहे. त्यामुळे किमान २ हजार औषधे दररोज पाहिजे.