मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने चालत्या गाडीतून उडी मारली आणि "मला वाचवा, मला वाचवा" असं ती ओरडत होती. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना ती तिचा जीव वाचवण्यासाठी विनवणी करू लागली. याच दरम्यान गोंधळ वाढल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. हे पाहून कार चालक घटनास्थळावरून पळून गेला.
लोकांनी महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तिला वाचवण्यासाठी गाडीकडे धाव घेतली, परंतु जेव्हा लोकांनी संपूर्ण घटना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही महिला बुधेरा गावची रहिवासी आहे आणि ज्या व्यक्तीसोबत ती गाडीतून आली होती तो तिचा नवरा असल्याचं सांगितलं जातं. गाडीमध्ये प्रवासादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि महिलेने चालत्या गाडीतून उडी मारली.
लोकांनी महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं तेव्हा तिने पोलीस ठाण्यात जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि टॅक्सीने घटनास्थळावरून निघून गेली. पोलिसांनी अशी कोणतीही महिला पोलीस ठाण्यात आली नसल्याचं किंवा कोणत्याही महिलेने या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचं म्हटलं आहे.
सुनीता अहिरवार असं या महिलेचं नाव असून ती बुधेरा गावातील रहिवासी आहे. महिला तिच्या पतीसोबत गाडीतून प्रवास करत होती. याच दरम्यान काही गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता, त्यानंतर महिलेने गाडीतून उडी मारली आणि "मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..." असं म्हणत गोंधळ घातला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.