MP Crime: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सबलगडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कारवाईचे आदेश दिले. एका महिलेशी केलेल्या असभ्य वर्तनाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. सबलगडचे एसडीएम अरविंद माहोर यांच्यावर महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याने याची जोरदार चर्चा सुरु झालीय.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन मोरेनाचे सबलगड एसडीएम यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. एसडीएम अरविंद माहोर हे एका तरुणीशी फोनवर अश्लील बोलायचे. मंगळवारी मोरेना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणीदरम्यान, पीडितेच्या कुटुंबाने एसडीएमच्या व्हिडिओसह तक्रार जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्याकडे सादर केली, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना काढून टाकले.
जिल्हाधिकारी अंकित अस्थाना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर त्यांनी एक अहवाल तयार करून चंबळ आयुक्तांना पाठवला. ही कारवाई आयुक्त स्तरावर असल्याने, तेथूनच निलंबनाचे आदेश जारी केले जातील. तक्रारदार महिलेने सांगितले की, "एसडीएमने त्यांच्या मुलीचा मोबाईल नंबर मिळवला होता. गेल्या वर्षभरापासून तो रात्री उशिरा फोन करत होता आणि अश्लील शेरेबाजी करत होता. त्यांच्या मुलीने त्याचे कॉल उचलणे बंद केले तेव्हा त्याने फोनवरून नातेवाईकांना धमकावण्यास सुरुवात केली. एसडीएम महिलेच्या मेहुण्याच्या दुकानात पोहोचले आणि धमकी दिली की तुमच्या मुलीच्या आणि वहिणीच्या अंगात खूप गर्मी आहे, मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवीन. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही अधिकारी नाही."
जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करावी लागेल. आम्हाला आता हा छळ सहन होत नाही, म्हणून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो आहोत. मुलीच्या काकांनी सांगितले की ५ सप्टेंबर रोजी एसडीएम माझ्या दुकानात आले आणि मी बोलवल्यावर तुम्ही आला का नाही असं विचारलं. मी त्यांना सांगितले की मी एक कामगार आहे. एसडीएमने मला धमकी दिली आणि सांगितले की जर मी वेळेवर आलो नाही तर तो माझ्या संपूर्ण कुटुंबाला अडकवेल. भीतीपोटी मी संध्याकाळी भेटायला गेलो. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी माझा मोबाईल काढला तेव्हा त्याने तो हिसकावून घेतला.
जनसुनावणीत महिलेने तिच्या तक्रारीसोबत एक व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. व्हिडिओमध्ये एसडीएम अपशब्द वापरताना दिसत आहेत. तो मेहुण्याला विचारतो, तुमची मेहुणी कुठून आहे? त्यानंतर तो अनेक आक्षेपार्ह टिप्पणी करतो. ही घटना उघडकीस आल्यानंतर, जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी मंगळवारी एसडीएम अरविंद माहोर यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.