लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गुरुवारी केवळ संसदेतच नाही तर बाहेरदेखील सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. गोंधळादरम्यान संसदेबाहेर सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आल्यानंतर धक्काबुक्की झाली. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर एनडीए आणि काँग्रेसने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच दोन्ही बाजुच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडेही तक्रार केली.
शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेबाहेर निषेध मोर्चा काढला. यादरम्यान सत्ताधारी खासदारांनी आंबेडकरांच्या मुद्यावरून संसद परिसरात निदर्शने केली. संसदेच्या मकरद्वाराजवळ सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आल्यानंतर धक्काबुक्की झाली.
यात ओडिशातील भाजप खासदार प्रताप सारंगी (६९) व उत्तर प्रदेशच मुकेश राजपूत जखमी झाले. यांच्या डोक्याला इजा झाली आहे. राजपूत यांची शुद्ध हरपली. या दोघांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले गेले. रुग्णालयात आणल्यानंतर राजपूत शुद्धीवर आले.
कसे आणि काय घडले : गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि विरोधी पक्षांतील खासदार घोषणाबाजी करत एकमेकांसमोर आले. त्यातून सुरुवातीला बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की झाली.
राहुल गांधींनी गैरवर्तन केले, भाजपचा आरोप
राहुल गांधी यांनी माझ्या अगदी जवळ येऊन घोषणाबाजी केली. गैरवर्तन केले, असा आरोप भाजपच्या महिला खासदार एस. फंगनोन कोनयाक यांनी केला. मला संरक्षण द्यावे, अशी मागणी कोनयाक यांनी सभागृहात केली. राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर भाजपच्या महिला खासदारांवर बळाचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत केल्यानंतर कामकाज तहकूब झाले. राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी असण्याच्या योग्य नाहीत. त्यांनी केलेले कृत्य लाजीरवाणे असून ही भारतीय संस्कृती नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला.
लोकसभा-राज्यसभेत गदारोळ
काँग्रेससह विरोधी पक्षांनी शाह यांच्या वक्तव्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया हे आसनावर बसण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी काँग्रेस पक्षावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर सकाळी ११ वाजून तीन मिनिटाने दुपारी दोन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर ते दिवसभरासाठी तहकूब झाले.
आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखले : राहुल
आम्ही संसदेत जाण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला रोखण्यात आल्याचा आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांकडून केले जाणारे धक्काबुक्कीचे आरोप फेटाळून लावले. भाजप खासदारांनी मला थांबवले, धमकावले. संसदेत प्रवेश करणे हा आमचा हक्क आहे. आम्हाला संसदेत जाण्याचा अधिकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
खरगे, प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व प्रियंका गांधी यांच्यासह अनेक महिला खासदारांसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सत्ताधारी खासदार काठ्या घेऊन आले होते, ही सरळरसळ गुंडागर्दी आहे. लोकशाहीच्या मंदिरात भाजपने हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप प्रियांका गांधी वाड्रा यांनी केला.
नितीशकुमारांनी भूमिका स्पष्ट करावी : केजरीवाल
अमित शाह यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांबाबत एनडीएच्या केंद्र सरकारचे समर्थक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पत्र दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना गुरुवारी लिहिले आहे.
अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व राजकारण संन्यास घ्यावा, अशी मागणी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही शाह यांच्यावर टीका केली.