केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी सुमारे १० लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. पण खूप कमी मुलांना यश मिळतं आणि IAS, IPS आणि IFS सारख्या प्रतिष्ठित पदांवर नियुक्ती मिळवतात. अनेक उमेदवार या परीक्षेसाठी अनेक वर्षे तयारी करतात. तर काही तरुणांनी पहिल्याच प्रयत्नात लहान वयात ही परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.
पश्चिम बंगालमधील तमाली साहा हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी UPSC ची प्रतिष्ठित भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि IFS अधिकारी बनली. तमाली साहाचा जन्म पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात झाला. प्राथमिक शालेय शिक्षण याच जिल्ह्यात पूर्ण झालं. तमालीने आपल्या अभ्यासादरम्यान नेहमीच चांगली कामगिरी केली
सुरुवातीपासूनच नागरी सेवेत रुजू होण्याकडे तिचा कल होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तमाली कोलकाता येथे राहायला गेली, जिथे तिने कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला होता. तमालीने तिच्या अभ्यासादरम्यान यूपीएससीची तयारी सुरू केली, तिने प्लॅनिंग, योग्य दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम घेऊन तयारी केली.
२०२० मध्ये तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC ची भारतीय वन सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या चमकदार कामगिरीमुळे तिची आयएफएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तमालीला पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले होते, जिथे ती आता तिची कर्तव्ये पार पाडत आहे. तमालीचे यश हे दृढनिश्चय, समर्पण आणि आत्मविश्वास यांचं प्रतीक आहे. वय किंवा अनुभवाचा अभाव यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही हे तिने सिद्ध केलं आहे.
तमाली साहा म्हणते की, योग्य नियोजन, शिस्त आणि ध्येयाप्रती प्रामाणिक राहणं ही कोणत्याही अडचणींवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. तिची गोष्ट केवळ UPSC परीक्षार्थींसाठीच नव्हे तर आपली स्वप्नं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.