Railway Jobs: रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळ वर्षभरात एक लाखाहून अधिक नोकऱ्या देण्याची तयारी करत आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, यावर्षी रेल्वेमध्ये ५० हजारांहून अधिक उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. तर पुढच्या वर्षी ५० हजारांहून अधिक नियुक्त्या करण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात परीक्षांद्वारे भरती केली जात असून आता परीक्षा केंद्रे उमेदवाराच्या घराजवळ दिली जात असल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
रेल्वे भरती मंडळ २०२५-२६ या वर्षात ५० हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने बुधवारी दिली. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) नऊ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रे देण्यात आल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. रेल्वे भरती मंडळांनी नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत ५५१९७ रिक्त पदांसाठी १.८६ कोटींहून अधिक उमेदवारांसाठी संगणक आधारित चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५०,००० हून अधिक उमेदवारांच्या नियुक्त्या होणार आहेत.
२०२४ मध्ये १.०८ लाख रिक्त पदे जाहीर करण्यात आली होती, त्यापैकी २०२५-२६ मध्ये ५०,००० हून अधिक आणि २०२६-२७ मध्ये ५०,००० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. 'आरआरबीने जाहीर केलेल्या वार्षिक कॅलेंडरनुसार, २०२४ पासून १,०८,३२४ रिक्त पदांसाठी बारा अधिसूचना आधीच जारी करण्यात आल्या आहेत आणि पुढील आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ५०,००० हून अधिक नियुक्त्या प्रस्तावित आहेत, असं रेल्वे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
तसेच या वर्षी रेल्वे भरती मंडळाने ९००० हून अधिक नियुक्ती पत्रे जारी केली आहेत.'या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रेल्वे भरती मंडळाने ९००० हून अधिक नियुक्त्या जारी केल्या आहेत. रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षांसाठी संगणक आधारित चाचण्या आयोजित करणे हे एक मोठे काम आहे ज्यासाठी खूप नियोजन आणि समन्वय आवश्यक आहे,' असंही या निवेदनात म्हटलं आहे.