पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आलं आणि सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आशिया कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) आगामी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताचे जवा आणि नागरिकांच्या रक्तापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य देण्यात आलं आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याला 'ब्लड मनी' म्हटलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या चतुर्वेदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत म्हटलं की, "जेव्हा आपल्या भारतीयांच्या आणि जवानांच्या रक्तापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूरबाबत ढोंगीपणा दाखवणाऱ्या केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे आणि प्रिय बीसीसीआय, हे फक्त ब्लड मनी नाहीत जे तुम्ही कमवू इच्छित आहात, तर ते शापित पैसे देखील आहेत."
आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबीमधील स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणं अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे विधान केलं आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान सामना 'ब्लॉकबस्टर सामना' असल्याच वर्णन केलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे आणि सुपर फोर आणि फायनल दरम्यान पुन्हा सामने खेळवता येतील असंही ACC ने म्हटलं आहे.