Sri Sri Ravi Shankar : जिंद : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या महाकुंभमेळ्याबाबत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी एक मोठे विधान केले आहे. मंगळवारी जिंदमधील सेक्टर ७-अ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने (Art of Living) एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, महाकुंभात केवळ संगमात स्नान केल्याने मोक्ष मिळत नाही, तर मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान सुद्धा आवश्यक आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.
या कार्यक्रमात शेतकरी आणि खाप संघटनांचे प्रतिनिधी आणि तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी, श्री श्री रविशंकर यांनी पिके आणि जात वाचवण्याचा संदेश दिला. तसेच, प्रत्येक गावातील लोकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी मोहीम सुरू करा, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना योगाकडे वळवा आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी खाप पंचायतींना केले.
आपण शेतकऱ्यांसोबत आहेत. पण, शेतकऱ्यांनी आनंदासोबतच समजूतदारही राहिले पाहिजे. तसेच, महाकुंभात केवळ संगमात स्नान केल्याने मोक्ष मिळत नाही, तर मोक्ष मिळविण्यासाठी ज्ञान सुद्धा आवश्यक आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. याचबरोबर, खाप पंचायतींच्या मोहिमेला पाठिंबा देत श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, लग्न एकाच गावात आणि एकाच कुळात होऊ नये. हे जात वाचवण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. हे रूढीवादी नाही तर याला वैज्ञानिक आधार आहे.
दरम्यान, हरयाणातील खाप पंचायती बऱ्याच दिवसांपासून एकाच गोत्रात आणि एकाच गावात होणाऱ्या विवाहांना विरोध करत आहेत. याबाबत अनेकदा आंदोलने सुद्धा झाली आहेत. अशा परिस्थितीत जिंदमधून श्री श्री रविशंकर यांनीही खाप पंचायतींच्या या जुन्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे खाप पंचायतींच्या मागणीला अधिक बळकटी मिळाली आहे, तर हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्याची खाप पंचायतींची मागणीही मोठ्या व्यासपीठावरून उठवण्यात आली आहे.